एकीकडे बाप, दुसरीकडे मुलगा… नशेत बुडालेली पिढी चिंतेत टाकणारी
शिरूर प्रतिनिधी
ग्रामीण संस्कृतीचा गाभा असलेले जत्रा-यात्रांचे उत्सव आज एका वेगळ्याच वळणावर उभे ठाकले आहेत. गावाच्या एकोप्याचे, परंपरेचे आणि आनंदाचे प्रतीक असलेले हे सोहळे आता काही ठिकाणी नशेच्या सावटाखाली हरवत चालल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.

अलीकडच्या काळात ग्रामीण भागातील यात्रांमध्ये चिंताजनक दृश्ये पाहायला मिळत आहेत. गावातील मनोरंजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या तमाशाच्या फडावर, एका बाजूला दारूच्या नशेत बेजबाबदारपणे नाचणारा पती, तर दुसऱ्या बाजूला त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत अविवाहित मुलगाही नशेत धुंद होऊन नाचताना दिसतो. एकाच कुटुंबातील दोन पिढ्या अशा प्रकारे व्यसनाच्या गर्तेत सापडलेल्या पाहून गावकऱ्यांच्या मनात खंत आणि चिंता निर्माण होत आहे.
ही केवळ एक घटना नसून, ग्रामीण समाजाच्या बदलत्या मानसिकतेचे आणि दिशाहीन होत चाललेल्या तरुणाईचे प्रतिबिंब आहे. स्वतःचे कोणतेही ठोस अस्तित्व किंवा ध्येय नसताना, केवळ नशेच्या आहारी जाऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे, ही काही तरुणांची प्रवृत्ती वाढताना दिसते. विशेष म्हणजे, पोलिसांची उपस्थिती असतानाही असे प्रकार बिनधास्तपणे घडताना दिसत आहेत, ही अधिक गंभीर बाब आहे.
गावाचा नावलौकिक, प्रतिष्ठा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची जबाबदारी प्रत्येक ग्रामस्थाची असते. मात्र, काहींच्या बेफिकीर वर्तनामुळे संपूर्ण गावाची प्रतिमा मलिन होत आहे. जत्रा-यात्रा या केवळ मनोरंजनासाठी नसून, त्या गावाच्या परंपरेचा आणि अस्मितेचा भाग आहेत, हे विसरले जात आहे.
या पार्श्वभूमीवर, ग्रामस्थ, पालकवर्ग, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासन यांनी एकत्र येऊन या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. तरुणाईला योग्य दिशा देणे, व्यसनमुक्तीबाबत जनजागृती करणे आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.
वेळ अजून गेलेली नाही…
गावपण जपायचे असेल, तर नशेच्या विळख्यातून बाहेर पडणे हाच एकमेव मार्ग आहे.