केंद्रप्रमुख परीक्षेत आदर्श शिक्षक महेश गावडे ठाणे जिल्ह्यात प्रथम, राज्यात १७ वा क्रमांक
शिरूर (प्रतिनिधी)
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी गावचे सुपुत्र तसेच ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालद (शहापूर) येथील आदर्श शिक्षक श्री. महेश लता बबनराव गावडे यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या केंद्रप्रमुख पात्रता परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत ठाणे जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर महाराष्ट्र राज्यात १७ वा क्रमांक मिळवला आहे. त्यांनी या परीक्षेत १६८ गुण मिळवत आपल्या गुणवत्तेची ठळक छाप उमटवली आहे.

वयाच्या अवघ्या कमी वर्षी त्यांनी मिळवलेले हे यश शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी मानले जात आहे. शालेय जीवनापासूनच अभ्यासात हुशार, जिज्ञासू व परिश्रमी विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती. शिक्षणाविषयी असलेली आवड, सातत्यपूर्ण अभ्यास, शैक्षणिक बांधिलकी आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी असलेली तळमळ यामुळे त्यांनी हे यश संपादन केले आहे.
सध्या ते ठाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालद (शहापूर) येथे शिक्षक म्हणून कार्यरत असून अध्यापनामध्ये विद्यार्थीकेंद्री शिक्षणपद्धती, नाविन्यपूर्ण उपक्रम, गुणवत्तावर्धनासाठी विविध शैक्षणिक प्रयोग आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यांच्या अध्यापनशैलीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण होत असल्याचे सहकारी शिक्षक व पालकांकडून सांगितले जाते.
त्यांच्या या यशामुळे टाकळी हाजी गाव, शाळा परिवार तसेच संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे, तसेच पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य राजेंद्रदादा गावडे यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षकवर्ग, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे टाकळी हाजी गावाचा नावलौकिक वाढला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. शिक्षण क्षेत्रात अधिक उंच शिखरे गाठत विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहावे, अशा शुभेच्छा सर्व स्तरांतून व्यक्त केल्या जात आहेत