क्रिकेटप्रेमी अक्षय काळाच्या पडद्याआड; शिंदोडी गाव हळहळले
शिंदोडी गावावर शोककळा; ११ केव्ही वीजतारेच्या धक्क्याने २७ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील शिंदोडी गावात रविवारी दुपारी घडलेल्या दुर्दैवी घटनेत ११ केव्ही उच्चदाब वीजवाहिनीची तार तुटून उसाच्या शेतात पडल्याने विजेचा धक्का बसून २७ वर्षीय अक्षय ऊर्फ बाळू धुळा हाके याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शिंदोडी गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून हाके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय हाके हा आपल्या घरालगत असलेल्या उसाच्या शेतात पाणी देण्याचे काम करत होता. शेताजवळून महावितरणची ११ केव्ही क्षमतेची वीजवाहिनी जात असून, दुपारच्या सुमारास अचानक वीजखांबावरील एक तार तुटून उसाच्या शेतात पडली. शेतात काम करत असताना ही तार अक्षयच्या निदर्शनास न आल्याने त्याचा त्या तारेशी संपर्क आला आणि त्याला जोरदार विजेचा धक्का बसला.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, उच्चदाब विजेच्या संपर्कामुळे अक्षयचा जागीच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
क्रिकेटप्रेमी, मनमिळावू स्वभावाचा तरुण हरपला
अक्षय हाके हा शांत, सुस्वभावी आणि सर्वांना आपलेसे करणारा तरुण म्हणून परिसरात परिचित होता. त्याला क्रिकेटची विशेष आवड होती. त्यामुळे शिंदोडीसह आसपासच्या गावांमध्ये त्याचा मोठा मित्रपरिवार होता. त्याच्या अकाली निधनाची बातमी समजताच अनेकांनी सोशल मीडियावर त्याच्या क्रिकेट खेळातील छायाचित्रे व व्हिडिओ शेअर करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
हाके कुटुंबावर पुन्हा दुःखाचा आघात
अक्षयच्या वडिलांचेही काही वर्षांपूर्वी अल्पवयात निधन झाले होते. त्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत त्याच्या आईने मोठ्या जिद्दीने अक्षय आणि त्याच्या मोठ्या भावाचे संगोपन केले. अशा परिस्थितीत अक्षयच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ, चुलते, चुलतभाऊ असा मोठा परिवार आहे.
जीर्ण वीजयंत्रणेबाबत ग्रामस्थांचा सवाल
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित ११ केव्ही वीजवाहिनीचे काम सुमारे १९७५ ते ७६ दरम्यान झाले होते. त्यामुळे अनेक वीजतारा आणि खांब जीर्ण अवस्थेत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. याच जीर्ण अवस्थेमुळे तार तुटून ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर परिसरातील जुने व धोकादायक वीजखांब आणि वीजतारा तातडीने बदलण्यात याव्यात, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी महावितरणने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
चौकशीची मागणी
या दुर्दैवी घटनेनंतर संबंधित वीजवाहिनीच्या देखभाल-दुरुस्तीबाबत प्रश्न उपस्थित होत असून, घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि मृताच्या कुटुंबाला योग्य ती मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
अक्षय हाके यांच्या अकाली निधनाने शिंदोडी गावासह संपूर्ण परिसर हळहळला असून, एका उमद्या आणि होतकरू तरुणाचा प्रवास अशा दुर्दैवी पद्धतीने संपल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.