गुणाट येथील संस्कार ग्रुपचा समाजहिताचा प्रेरणादायी उपक्रम;
जाधव विवाहासाठी “संस्कार कन्यादान” अंतर्गत मदतीचा हात
शिरूर प्रतिनिधी
शिरूर तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपत अनेक विधायक उपक्रम राबविणाऱ्या गुणाट येथील संस्कार ग्रुपच्या वतीने “संस्कार कन्यादान : एक हात मदतीचा” हा स्तुत्य उपक्रम अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. समाजातील कन्यादानासारख्या पवित्र कार्यात आर्थिक हातभार लावत संस्कार ग्रुपने आजवर अनेक कुटुंबांना दिलासा दिला असून, या उपक्रमाचे हे ४८ वे कन्यादान ठरले आहे.

गावातील कोणत्याही मुलीच्या विवाहप्रसंगी त्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून उभे राहत, वधूच्या माता-पित्याला मदतीचा हात देण्याची परंपरा संस्कार ग्रुपने जपली आहे. त्याचाच एक भाग म्हणून दि. ०९ मे २०२६ रोजी गावातील कृष्णा बापूराव जाधव यांची सुकन्या कु. वैष्णवी हिच्या शुभविवाहानिमित्त संस्कार ग्रुपच्या वतीने वधूपित्याला १० हजार रुपये रोख स्वरूपात मदत करण्यात आली. यावेळी वधू माता-पित्यांचा फेटा, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी “संस्कार कन्यादान” हा उपक्रम केवळ आर्थिक मदत नसून समाजातील माणुसकी, आपुलकी आणि सामाजिक ऐक्य जपणारा उपक्रम असल्याचे सांगितले. कन्यादानाच्या पवित्र कार्यात समाजाने अशा प्रकारे सहभागी होणे ही खऱ्या अर्थाने सामाजिक संस्कारांची जपणूक असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
यावेळी संस्कार ग्रुपचे संस्थापक तथा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सतीश कोळपे सर, ग्रामपंचायत सदस्य व सोसायटीचे संचालक सुभाषराव भैरट, पोलीस पाटील हनुमंतराव सोनवणे, सोसायटीचे तज्ञ संचालक मनोजदादा गव्हाणे, संस्कार ग्रुपचे अध्यक्ष शामकांत गोरडे, उपाध्यक्ष सचिन करपे, सचिव गोकुळ तासकर, खजिनदार महेश गाडे, तसेच महेश भैरट, गणेश सोनवणे, प्रदीप सोनवणे, किसन सोनवणे, जीवन भैरट,ज्ञानेश्वर गाडे, स्वागत कांबळे, सतीश डोंगरे आणि जाधव कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजकार्याची परंपरा जपत संस्कार ग्रुपने उभारलेला हा उपक्रम आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, “एक हात मदतीचा” ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून साकार होत असल्याचे चित्र यानिमित्त पाहायला मिळाले.