सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी मिळवूनही मातीशी नाळ जपणारा शेतकरी,ग्राहकांचा विश्वास जपणारा व्यापारी आणि माणुसकी जपणारा माणूस : श्री.रामदास चोरे यांचा प्रेरणादायी प्रवास
शिरूर (प्रतिनिधी)
एखाद्या माणसाची ओळख त्याच्या पदवीने नव्हे, तर त्याच्या कर्तृत्वाने आणि माणुसकीने होते,याचे जिवंत उदाहरण म्हणजे टाकळी हाजी येथील सुप्रसिद्ध किराणा व्यापारी श्री.रामदासशेठ सावकार चोरे. १५ एप्रिल २०२६ रोजी ते ६२ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. डोंगरगण या मूळ गावची माती कपाळी लावून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.मात्र नोकरीच्या मागे न लागता त्यांनी शेती आणि व्यवसायाची वाट निवडत १९९२ साली टाकळी हाजी येथे कृषी व्यवसायास सुरुवात केली.प्रारंभी ‘सारिका कृषी सेवा केंद्र’च्या माध्यमातून खत विक्री व्यवसाय सुरू केला, त्यानंतर ४ जानेवारी १९९८ रोजी ‘सारिका प्रोव्हिजन किराणा स्टोअर्स’ ची स्थापना करून त्यांनी किराणा व्यवसायातही आपली वेगळी ओळख निर्माण केली.

प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरील हे दुकान गेली २८ वर्षे प्रामाणिकपणे व सचोटीने सुरू आहे.व्यवसायासोबतच ते प्रगतीशील शेतकरी म्हणूनही ओळखले जातात.डाळिंब आणि कांदा ही त्यांची प्रमुख पिके असून आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून त्यांनी शेतीतही प्रगती साधली आहे.शिक्षण, शेती आणि व्यापार यांचा उत्तम समन्वय त्यांच्या कार्यातून दिसून येतो.
या यशस्वी वाटचालीत त्यांच्या पत्नी सौ.छायाताई रामदास चोरे यांची मोलाची साथ लाभली आहे.मोठी मुलगी सौ.सारिका सुनिल उचाळे (डी.एड.), मोठा मुलगा संदीप रामदास चोरे (डी.एड.) आणि लहान मुलगा वैभव रामदास चोरे (बी.एस.सी.ॲग्री) अशी तीन अपत्ये असून तिघेही शेती व व्यवसायाशी निगडित आहेत. त्यांचे मेव्हणे डॉ.सुभाष रामचंद्र पोकळे (माजी सदस्य, पंचायत समिती शिरूर) व त्यांच्या पत्नी डॉ.कल्पना सुभाष पोकळे (माजी सदस्या, पंचायत समिती शिरूर) यांचेही कुटुंबाला मार्गदर्शन लाभले आहे.
प्रेमळ, दानशूर व नेहमी मदतीसाठी तत्पर असलेले रामदास चोरे हे टाकळी हाजी परिसरात सर्वांच्या मनातील जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या साधेपणातच त्यांचे मोठेपण दडलेले आहे.त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील आयुष्यात अधिक यश लाभो, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
✍️ शब्दांकन : श्री.दत्तात्रय अनंतराव चिकटे सर (एम.ए.एम.एड.)
(आदर्श शिक्षक, जि.प.प्राथमिक शाळा उचाळेवस्ती)