ताजे अपडेट

सेवापूर्ती एका असामान्य व्यक्तिमत्त्वाची….. शाळेचा लिपिक ते मुख्याध्यापक…… संघटक ते राज्याचा अध्यक्ष…… थक्क करणारा एक प्रवास

शिरूर प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य टीडीएफचे अध्यक्ष तसेच जय हिंद हायस्कूल कासुर्डी, ता.दौंड जिल्हा पुणे चे मुख्याध्यापक जी.के. उर्फ गोरखनाथ किसन थोरात
येत्या 23 एप्रिल रोजी आपल्या अखंड अविरत सेवेची 36 वर्ष पूर्ण करून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. त्यांचा हा छत्तीस वर्षाचा प्रवास केवळ हा एक शैक्षणिक प्रवास नसून त्यांच्या संघर्ष, कर्तुत्व आणि यशाचा सोनेरी इतिहास आहे.

 

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खुटबाव सारख्या एका छोट्याशा गरीब शेतकरी कुटुंबामध्ये वडील किसनराव व आई गंगुबाई यांच्या पोटी 23 एप्रिल 1968 रोजी सरांचा जन्म झाला. कसलीही कौटुंबिक शैक्षणिक व सामाजिक पार्श्वभूमी नसताना व अठरा विश्व कुटुंबामध्ये गरीबी असताना शिक्षणासाठी व जगण्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. दोन मोठे भाऊ व दोन बहिणी‌ चार जणांचा शिक्षणाचा खर्च आई-वडिलांना परवडणारा नव्हता तरी इच्छाशक्तीच्या जोरावर या सर्वांनी आपापल्या परीने शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.
आपले प्राथमिक शिक्षण खुटबाव या गावातील जीवन शिक्षण विद्या मंदिर या झेडपीच्या शाळेत पूर्ण करून इयत्ता दहावी पर्यंत माध्यमिक शिक्षण जवळच असणाऱ्या नाथाच्या वाडीतील माटोबा विद्यालयातून पूर्ण केले.
दहावी पास झाल्यानंतर पुढे काय ? कसलेही मार्गदर्शन नव्हते,समोर काळाकुट्ट अंधार होता रोजंदारीवर कामाला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आई-वडिलांची पुढे शिकवण्याची ऐपत नव्हती परंतु सरांच्या जिद्दीपुढे परिस्थितीने हार मानली नाही आणि यातूनच पुढील शिक्षणासाठी अण्णासाहेब आवटे विद्यालय मंचर येथे आपल्या बहिणीच्या गावी राहून पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी अकरावी कॉमर्स शाखेमध्ये प्रवेश घेतला.
खर तर सरांच्या जीवन संघर्षाशी निगडित सुरेश भटांच्या ‘रोखण्यास वाट माझी वादळे होती आतुर…… डोळ्यात जरी गेली धूळ,थांबण्यास उसंत नाही ‘ या कवितेच्या ओळी अतिशय समर्पक वाटतात. आणि येथूनच सरांचा जीवन संघर्ष सुरू झाला परंतु नंतर सरांनी कधीही मागे वळून पाहिलेच नाही.
अंगावर फक्त मोठ्या भावाच्या लग्नातला ड्रेस, पायात साधी स्लीपर आणि एक पायजमा व‌ दोन वह्या एवढीच शैक्षणिक शिदोरी बरोबर घेऊन प्रवास सुरू झाला. चार किलोमीटर पायी चालत कॉलेजला जावे लागत असे. शालेय वातावरण, तिथली परिस्थिती पाहून सरांचा मन तिथे जास्त वेळ रमलं नाही. खिशात एक दमडी नाही अशा परिस्थितीत रोज सर स्वतः अनुभव सांगतात की येता जाता रस्त्याच्या कडेला पडलेले लोखंडाचे तुकडे पत्र्याचे तुकडे गोळा करून एका ठिकाणी ठेवायचे व नंतर ते दुकानात नेऊन विकून त्याचा वडापाव आणि भेळ खायची. परिस्थितीचे अतिशय वाईट वाटायचे परंतु आई-वडिलांचे कष्ट, त्यांची गरिबी त्यांच्या खस्ता आठवल्या की पुन्हा नवी जिद्द, नवी उमेद त्यांच्यामध्ये निर्माण व्हायची.पोटाची खळगी भरण्यासाठी केलेली धडपड सर आजही प्रामाणिकपणे सांगतात.आजूबाजूची परिस्थिती पाहून शाळा कॉलेजमधील विद्यार्थी त्यांची कपडे, त्यांची मौज मजा पाहून सरांचे मन विषन्न झाले. या सामाजिक विषमतेने लहान वयातच त्यांच्यावर अनेक आघात केले आणि यातूनच जी.के.थोरात नावाचा एक संघर्ष योद्धा उभा राहिला. अण्णासाहेब आवटे विद्यालय मंचर येथून अकरावी पूर्ण करून बी.ए.मराठी बहिस्थ विद्यार्थी म्हणून अण्णासाहेब मगर महाविद्यालय हडपसर येथे प्रवेश घेतला कारण नियमित कॉलेजला उपस्थित राहून कॉलेज करणे आर्थिक परिस्थितीमुळे शक्य नव्हते. शिक्षण चालू ठेवावे की पोटाची खळगी भरावी असा दुहेरी पेच सरांच्या पुढे उभा होता परंतु हा पेच सरांनी शिताफिने सोडवला या काळामध्ये रोजगार हमी योजना, ऊसतोड कामगार, रंगारी काम, राजकीय निवडणुकांमध्ये प्रचाराच्या वेळेस उमेदवारांच्या नावाच्या, चिन्हांच्या भिंती रंगवणे,तसेच तलाठ्याच्या हाताखालची छोटी-मोठी कामे करून आपले बी.ए व‌ पुढे एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले. लहान वयातच आर्थिक परिस्थितीमुळे गरिबीची चटके काय असतात याची सरांना जाणीव होती. बराच वेळा घरातून कुठेतरी निघून जावे असे विचार येत.पदवी घेत असतानाच कुठे नोकरी मिळते का यासाठी हेलपाटे सुरू होते कुणाला विचारले तर आधी पदवी पूर्ण करा मग नोकरीचे पाहू अशी उत्तरे यायची आणि पदवी झाल्यानंतर अजून पुढे शिकायला पाहिजे ‌ एवढ्यावर नोकरी मिळत नाही हा अनुभव त्यांना आला. यातूनच खुटबाव येथील शिक्षण संस्थेमध्ये लिपिकाला सहाय्य करण्याची संधी उपलब्ध झाली.
परंतु गावगाड्याच्या राजकारणाचा फटका सरांना इथे बसला आणि या नोकरीवर पाणी सोडायला लागले. याच ओळखीतून पुढे कासुर्डी येथे शालेय कामकाज पूर्ण करून देण्यासाठी पाचशे रुपये महिना मानधनावर लिपिकाची नोकरी स्वीकारली. शंभर रुपये महिना हप्त्याने खरेदी केलेल्या सायकलीने आपण आपला प्रवास सुरू केला. खरे तर सरांची आंतरिक तळमळ, त्यांची जिद्द, त्यांचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. लिपिकाची नोकरी हा आपला अंतिम प्रवास नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी शिक्षकी पेशासाठी लागणारी व्यावसायिक पात्रता उमरगा येथे पूर्ण करून 1989- 90 मध्ये कासुर्डीच्या जय हिंद विद्यालयातून खऱ्या अर्थाने आपल्या शिक्षकी पेशाला सुरुवात केली. आपल्यानंतर आपल्या अनेक सहकार्यांना सुद्धा उमरगा येथून व्यावसायिक पात्रता पूर्ण करून देण्यास मोलाचे सहकार्य केले. यानंतर सरांनी कधी मागे वळून पाहिले नाही. आपले कर्तृत्व, व्यक्तिमत्व,उत्तम नेतृत्व गुण, उत्तम वक्ता, निवेदक, पत्रकार अशा अनेक गुणांना सरांनी योग्य न्याय दिला व पंचक्रोशीत एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून सरांनी नावलौकिक मिळवला.
या काळात खुटबाव येथे सार्वजनिक गणेशोउत्सव एक गाव एक गणपती, नवरात्र उत्सव,बैलगाडा शर्यती क्रिकेटच्या स्पर्धा असे अनेक सामाजिक उपक्रम गावामध्ये राबवून आपल्या कार्यकर्तृत्वाचा वेगळा ठसा उमटवला. यातूनच परिसरामध्ये जी.के.थोरात सर एक अष्टपैलू, सर्व गुणसंपन्न,हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणून उदयाला आले. जी.के. या नावाप्रमाणेच कला, क्रीडा समाजकारण, राजकारण कृषी,साहित्य, पत्रकारिता या सर्वच क्षेत्राची उत्तम जाण त्यांना होती यातूनच एक अष्टवधानी अष्टपैलू व्यक्तिमत्व तावून सुखावून निघाले. आज शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक चालत बोलत विद्यापीठ म्हणून जी.के. थोरात सरांच्या कडे पाहिले जाते.

1994 हे साल सरांच्या जीवनाला कलाटणी देणारे ठरले कारण याच वर्षी श्रीगोंदा येथील शिक्षक हौसराव इथापे सरांच्या सर्वगुणसंपन्न सुसंस्कृत अशा सौ.संगीताशी सरांचा विवाह झाला. हा विवाह सुद्धा सरांनी अतिशय साधेपणाने कोणताही डामडौल,बडेजाव न करता कुठलीही अंधश्रद्धा न पाळता संपन्न केला. लग्न मंदिरामध्ये अतिशय साधेपणाने करून वाचवलेल्या पैशातून त्यांनी स्वतःसाठी निवारा उभा केला व गावामध्ये एक वेगळा आदर्श घालून दिला.
लग्नामुळे सरांच्या जीवनाला स्थिरता आली सौ.संगीता वहिनींच्या रूपाने घरामध्ये लक्ष्मी अवतरली होती आणि याच लक्ष्मीच्या परिस्पर्शाने सरांचं अख्ख जीवन सोन्याने उजळून निघालं.
जय हिंद विद्यालयामध्ये सर सर एक आदर्श व विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून नावारूपाला आलेले होते. मराठी विषयावर सरांची उत्कृष्ट पकड होती. आपल्या मार्गदर्शनाखाली सरांनी हजारो विद्यार्थी घडवले. आज हे विद्यार्थी आपापल्या व्यवसायामध्ये,नोकऱ्यांमध्ये स्थिरस्थावर झालेले दिसून येतात. यामध्ये प्रामुख्याने वकील, व्यवसायिक नोकरदार व उच्च पदस्थ अधिकारी यांचा समावेश आहे.शाळेमध्ये अनेक उपक्रम राबवून त्यांनी शाळा सुद्धा नावारूपाला आणली होती. कला,क्रीडा,विज्ञान प्रदर्शन या सर्व स्पर्धांमध्ये सर हिरीरीने सहभागी होत. चित्रकला वाद्य वादन याच्यात सरांचा हातखंडा होता. विद्यार्थी हेच दैवत म्हणून नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला सरांनी प्राधान्य दिले. सहकारी शिक्षक, संस्था चालक यांच्याबरोबर सरांचे नेहमीच आपुलकीचे व आपुलकीचे संबंध राहिले. कासुर्डी गावामध्ये दोन राजकीय गट असल्यामुळे नेहमीच शाळेमध्ये काट्याची कसरत असायची परंतु सरांनी गटातटाचे राजकारण न करता सर्व लोकांना,सहकार्यांना बरोबर घेऊन शाळेचा व गावाचा विकास साधण्यावर भर दिला. गावामध्ये दोन गट असूनही दोन्ही गटाच्या वेगवेगळ्या पतसंस्थेमध्ये सरांनी संचालक म्हणून उत्कृष्ट भूमिका बजावली.

“अन्नदानं परं दानं विद्यादानमतः परम् ।
अन्नेन क्षणिका तृप्तिर्यावज्जीवं च विद्यया ॥” 

वरील संस्कृत सुभाषिताप्रमाणे खऱ्या अर्थाने आपण विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची भूक भागवण्यासाठी, विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून संस्था व शिक्षकांच्या माध्यमातून नेहमीच प्रयत्नशील राहिलात.
ज्या संस्थेमध्ये आपण लिपिकाची नोकरी सुरू केली आज त्याच खुटबावच्या भैरवनाथ शिक्षण मंडळ या संस्थेमध्ये आपण संचालक म्हणून संस्थेचे काम पाहत आहात ही आपल्यासाठी अतिशय अभिमानाची बाब म्हणावी लागेल.
आपण नेहमीच शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आपले कार्य अविरत पणे सुरू ठेवले.
याचाच परिपाक म्हणजे आपल्या शैक्षणिक कार्याची व विद्यार्थ्याप्रती असलेल्या तळमळीची दखल घेऊन 2014 साली महाराष्ट्र राज्य शासनाने आपणास राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण. त्याचप्रमाणे आपल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन आजपर्यंत जवळपास शंभर च्या वर पुरस्काराने आपणास सन्मानित केले हे आपल्या कार्याचे द्योतकच म्हणावे लागेल.
याच काळामध्ये आपण आपल्यामध्ये असणाऱ्या लेखन कौशल्य या सूप्त गुणांना वाव दिला. आपण चार व्यक्तीचरित्र पर पुस्तके लिहून ती प्रकाशित केली. त्याचप्रमाणे शून्यातून विश्व निर्मिती करणाऱ्या असामान्य लोकांची कहाणी व्याख्यानाच्या माध्यमातून समाजापुढे मांडण्याचं महत्त्वाचं कार्यही केले.
मुलांची शाळा बदलली तसं आपण आपलं गाव बदलत राहिला. आपल्या मुलांच्या शिक्षणाला नेहमीच आपण प्राधान्य दिले. खुटबाव, यवत,उरुळी कांचन व हडपसर असा आपण मुलांच्या शाळेबरोबर प्रवास केला. प्रत्येक ठिकाणी त्या गावाची सामाजिक परिस्थितीशी समरस होऊन त्या गावाच्या विकासासाठी आपण हिरहिरीने भाग घेतला. यवत सारख्या ठिकाणी नेत्र शिबिर, रक्तदान शिबिर, एक गाव एक गणपती अशी उपक्रम राबवले. या गावातूनच आपण आपल्या पत्रकारितेच्या कार्याचा श्रीगणेशा केला व अनेक वर्ष तालुक्यामध्ये एक निर्भीड पत्रकार म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली.उरुळी कांचन सारख्या मोठ्या गावामध्ये उरुळी कांचन फेस्टिवल सारखा उत्सव आपण यशस्वी करून दाखवला. आपल्यामध्ये असणाऱ्या सामाजिक कार्याच्या उपजत गुणाला उरुळी कांचन सारख्या ठिकाणी मोठा वाव मिळाला यातूनच अनेक प्रथितयश लोकांशी आपले चांगले वैचारिक व सामाजिक संबंध जुळून आले.
उत्तम नेतृत्व गुण व प्रभावी भविष्याचा वेध घेणारं संघटन कौशल्य ही आपल्यामध्ये असणारे दोन उत्कृष्ट गुण. या गुणांच्या जोरावरच संघटक पदापासून सुरू झालेला आपला प्रवास राज्याच्या अध्यक्षा पर्यंत पोहोचला. ज्या संघटनेमध्ये आपण संघटक या शेवटच्या पदांनी सुरुवात केली होती त्याच महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीमध्ये आज आपण राज्याचा अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहात ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. या संघटनेवर आपल्या नेतृत्व कर्तुत्वाची छाप दिसून येते. मधल्या कालखंडामध्ये ही संघटना मोडकळीस आली होती परंतु आपली दूरदृष्टी, उत्तम नेतृत्व गुण व संघटन चातुर्य या जोरावर आपण महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीची पुनर्बांधणी केली व पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य टीडीएफचे नाव, टीडीएफ चा झेंडा गौरवाने फडकवला याचे सर्व श्रेय आपणास जाते. याच संघटनेच्या माध्यमातून 2020 मध्ये आपण पुणे विभाग शिक्षक मतदार संघाची आमदारकीची निवडणूक लढवली यातूनच आपल्या नेतृत्वगुणांची संघटन कौशल्याची चूनुक महाराष्ट्र राज्याला झाली.
‘पेरा म्हणजे उगवेल’ या वुक्तीप्रमाणे आपण सतत कार्य करत राहिलात. ज्याप्रमाणे शेतकरी बियाणे पेरतो त्याप्रमाणे आपण संघटनेमध्ये कार्यकर्ते पेरले.
असं म्हटलं जातं मोठ्या झाडांच्या छायेमध्ये छोटी झाडे वाढत नाहीत परंतु त्याला आपलं नेतृत्व हे अपवाद होतं. आपल्या छत्रछायेमध्ये असंख्य कार्यकर्ते आपण संघटनेमध्ये तयार केले. हजारो शिक्षकांना आपल्या कारकीर्दीत संघटनेच्या माध्यमातून पुरस्कार देऊन पाठीवर कौतुकाची थाप दिली.अनेकांना आपण प्रोत्साहन देऊन जीवनामध्ये प्रगती साधण्यासाठी मार्गदर्शन केले. खरं तर सरांचे शैक्षणिक सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रामध्ये केलेल्या कामगिरीचे, योगदानाचे व मिळालेल्या यशाचे सार जर सरांच्याच शब्दात सांगायचे झाले तर मजरूह सुलतानपूरीच्या ‘मै अकेला ही चला था जानिब-ए- मंजिल मगर लोक साथ आते गये और कारवां बनता गया’ या ओळी अतिशय समर्पक वाटतात.
सेवापूर्ती नंतरही आपण उद्योगी राहावं या उद्देशाने परिसरातील नागरिकांसाठी, वृद्धांसाठी निसर्गरम्य वातावरणामध्ये उत्तम राहण्याची, जीवन व्यतीत करण्याची सोय व्हावी या उद्देशाने थोरात ऍग्रो टुरिझम नावाचं सुंदर असं निसर्गरम्य आनंदवन तयार करून सामाजिक बांधिलकी जपली.
आपण जर चांगलं कार्य करत राहिलो तर त्याचे फळ आपल्याला नक्कीच भेटते याप्रमाणे आपल्याला आपल्या मुलांच्या माध्यमातून आपल्या कार्याचे फळ मिळाले. सर्व गुणसंपन्न संतती लाभणं हे मोठं भाग्यच असते आणि हे भाग्य सरांना त्यांच्या मुलांच्या रूपाने मिळाले. सरांचा मोठा मुलगा अनिकेत आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून अमरावती येथे सहाय्यक कामगार आयुक्त या पदावर कार्यरत आहे त्याचप्रमाणे कन्या सौ.स्नेहा गडाख ही दिवानी न्यायाधीश पदी कार्यरत आहे. जावई श्री. ओंकार गडाख हे सुद्धा दिवाणी न्यायाधीश पदी कार्यरत आहेत आपली दोन्ही मुले तसेच जावई क्लास वन अधिकारी आहेत,औषधनिर्माण शास्त्रातली पदवी असणारी, उच्चशिक्षित, सुस्वाभावी व सुसंस्कृत शिरूर तालुक्यातील नामांकित अशा कोहकडे परिवारातील मुलगी सौ.वैष्णवी आपणास सून म्हणून मिळाली याच्यापेक्षा मोठा आनंद एका शिक्षकाला काय तो असतो याची परिचिती आपल्याला आलीच आहे. या दोन्ही मुलांच्या भव्य दिव्य विवाह सोहळ्याचाचे कौतुक संपूर्ण जिल्हाभर झाले.
आपल्या दोन्ही मुलांनी या मिळवलेल्या दैदीप्यमान यशामुळे खुटबाव ग्रामस्थांच्या वतीने भव्य मिरवणूक काढून आपणा सर्वांचा सन्मान केला. खरंच आपले आयुष्य कृतार्थ झाल्यासारखे झाले. संपूर्ण जिल्हाभर आपणाकडे एक यशस्वी आदर्श कुटुंब म्हणून पाहिलं जाते. येणाऱ्या अनेक पिढ्या आपल्या कुटुंबाचा आदर्श व प्रेरणा घेतील यात शंका नाही. खरंतर आपण शैक्षणिक, सामाजिक, संघटनात्मक क्षेत्रामध्ये करत असलेल्या कार्याचे हे रिटर्न गिफ्टच म्हणावे लागेल.
या संपूर्ण प्रवासात आपल्या आई-वडिलांच्या आशीर्वाद, पत्नी सौ.संगीता शिक्षकी पेशाला लागणारी व्यावसायिक पात्रता पूर्ण करूनयही केवळ कुटुंब आणि मुलांच्या करिअर साठी नोकरी न करणाऱ्या सौ.संगीता वहिनींची यामध्ये खूप मोलाची साथ होती त्यांच्या सहकार्य व साथी शिवाय हा टप्पा गाठणे शक्यच नव्हते.
आपल्या या प्रवासात आपले आई- वडील, पत्नी,मित्रमंडळी, नातेवाईक, संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि सर्व सहकारी शिक्षक व‌ विद्यार्थी या सर्वांची मोलाची साथ लाभली. या सर्वांच्या सहकार्या शिवाय या जीवनरुपी शैक्षणिक सागराचा पल्ला पार करणे शक्यच नव्हते.
आज आपण विश्रांतीच्या टप्प्यावर आहात,मागे वळून पाहताना आयुष्याचे सार्थक झाल्याचा आनंद तसेच शैक्षणिक क्षेत्रासाठी मोलाचे योगदान दिल्याचा,आपली उच्चपदस्थ मुलं स्थिरावलेली पाहून एक वेगळा अभिमान व आनंद तुमच्या चेहऱ्यावर झळकतोय.

‘कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते,
सोबत जन्मणारी नवी पहाट असते’
आपण सेवानिवृत्त होत आहात, आपण दुसरी इनिंग सुरू करत आहात.आपणास सेवापूर्तीच्या आणि भविष्यातील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.सेवापूर्ती नंतरचे आपले आयुष्य आनंदी, सुख समाधानाचे व निरामय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

शब्दांकन
प्रा.संतोष परशुराम थोरात
(अध्यक्ष- पुणे शहर टीडीएफ)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका