ताजे अपडेट

निमगाव दुडे येथील पांडवकालीन माता शिरसाई देवी मंदिर जीर्णावस्थेत; संवर्धनासाठी ग्रामस्थांची तीव्र मागणी

टाकळी हाजी (प्रतिनिधी)                                        शिरूर तालुक्यातील घोडनदीच्या तीरावर वसलेले निमगाव दुडे येथील पूर्वप्राचीन श्री.शिरसाई देवीचे हेमाडपंथी दगडी मंदिर सध्या जीर्णावस्थेत असून या ऐतिहासिक,धार्मिक व सांस्कृतिक वारशाच्या जिर्णोद्धारासाठी ग्रामस्थांनी तीव्र मागणी केली आहे.पांडवकालीन परंपरेशी संबंधित मानले जाणारे हे मंदिर इतिहास संशोधक, पुरातत्त्व अभ्यासक व भाविकांसाठी महत्त्वाचे ठरू शकते.

 

निमगाव दुडे ते आमदाबाद गावास जोडणाऱ्या प्रमुख मार्गालगत, पोकळेवस्ती परिसरादरम्यान शांत वातावरणात हे मंदिर रस्त्यालगत असल्याने परिसरातील भाविकांना दर्शनासाठी सहज येणे शक्य होत असून या प्राचीन देवस्थानामुळे परिसराच्या ऐतिहासिक ओळखीत भर पडत आहे.पूर्णपणे मोठमोठ्या दगडी शिळांमध्ये बांधलेले हे मंदिर चौकोनी रचना, मजबूत दगडी भिंती, पारंपरिक वास्तुशैली व कलात्मक बांधकामामुळे आजही लक्ष वेधून घेते.मंदिर परिसरात अनेक दगडी अवशेष, भग्न शिळा, कोरीव बांधकामाचे तुकडे व जुन्या स्थापत्याचे पुरावे पडलेल्या अवस्थेत दिसून येतात. मंदिराच्या गाभाऱ्यात चार उभे दगडी खांब असून मध्यभागी कोरीव झुंबरासारखी आकर्षक नक्षी पाहावयास मिळते. प्रत्येक खांबाच्या चहूबाजूंनी लेण्यांतील शिल्पकलेची आठवण करून देणाऱ्या देवीच्या रक्षणकरणाऱ्या महिलांच्या कोरीव मूर्ती अत्यंत सुंदर पद्धतीने साकारण्यात आल्या आहेत.गाभाऱ्यात श्री.शिरसाई देवीची मूर्ती विराजमान असून भाविक श्रद्धेने दर्शन घेतात.

स्थानिक रहिवासी गोपीचंद पोकळे यांनी सांगितले की, अनेक पिढ्यांपासून हे मंदिर गावकऱ्यांच्या श्रद्धास्थानी आहे.देवीच्या कृपेने गावावर कोणतेही मोठे संकट आले नसल्याची ग्रामस्थांची ठाम श्रद्धा आहे. गावातील अनेक धार्मिक कार्यक्रम देवीच्या साक्षीने पार पडतात.श्रावण महिन्यात तसेच नवरात्रोत्सवात येथे घटस्थापना, पूजा-अर्चा पार पडतात.

मंदिर परिसर स्वच्छता, सुशोभीकरण तसेच ‘शिरसाई देवी’ नामफलक उभारणीचे कार्य उद्योजक संतोष पानगे यांनी पुढाकार घेऊन केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या या सामाजिक व धार्मिक कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.बापुसाहेब गावडे पतसंस्थेचे संचालक विजय थोरात यांनी सांगितले की,मंदिराची रचना, दगडी बांधकाम शैली व नाव पाहता बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील शिरसाई देवी मंदिराशी साम्य दिसून येते.या दोन्ही मंदिरांचा ऐतिहासिक संदर्भ तपासण्याची आवश्यकता आहे.

मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता पुरातत्त्व विभाग, इतिहास अभ्यासक व प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून संवर्धनासाठी पुढाकार घ्यावा,अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.योग्य जिर्णोद्धार झाल्यास हे मंदिर धार्मिक पर्यटनस्थळ म्हणूनही विकसित होऊ शकते.या प्राचीन मंदिराचा वारसा जतन करण्यासाठी ग्रामस्थांनी लोकसहभागातून निधी उभारणी, स्वच्छता मोहीम, परिसर विकास व जिर्णोद्धारासाठी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.शेकडो वर्षांचा इतिहास जपणाऱ्या श्री.शिरसाई देवी मंदिराच्या संवर्धनासाठी सर्व स्तरांतून पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

निमगाव दुडे येथील श्री.शिरसाई देवी मंदिर हे ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे.या प्राचीन मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी प्रशासन स्तरावर आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून संबंधित विभागांशी पाठपुरावा केला जाईल. ग्रामस्थांनीही लोकसहभागातून पुढाकार घेतल्यास मंदिर संवर्धनाचे काम अधिक गतीने होऊ शकते.

श्री.राजेंद्र पोपटराव गावडे (सदस्य जि.प.पुणे)

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका