ताजे अपडेट

दिल्लीतील राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत शरदवाडीच्या तेजस्वी अशोक गांजेची दमदार कामगिरी

शिरूर (प्रतिनिधी)                                       दिल्ली येथे भारतीय शालेय क्रीडा महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले.या विजयी महाराष्ट्र संघामध्ये शिरूर तालुक्यातील शरदवाडी (जांबुत) गावची कु.तेजस्वी अशोक गांजे हिचा समावेश आहे.तिच्या या उल्लेखनीय यशामुळे शरदवाडी गावासह संपूर्ण शिरूर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

तेजस्वी ही शरदवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य ह.भ.प.अशोक महाराज गांजे यांची कन्या असून लहानपणापासूनच तिला क्रीडा क्षेत्राची विशेष आवड आहे.शालेय जीवनापासूनच तिने खेळात सातत्यपूर्ण सराव,मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर विविध स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तिच्या अथक परिश्रमाचे फळ म्हणून तिला राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.

सध्या तेजस्वी ही शिरूर तालुक्यातील कै.रामराव गेनूजी पलांडे माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, मुखई येथे शिक्षण घेत असून तिच्या प्रगतीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य शिरसाठ सर, क्रीडा शिक्षक दिवार सर तसेच महाराष्ट्र राज्य बेसबॉल संघ असोसिएशनचे अध्यक्ष अशोक सरोदे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच तेजस्वीने क्रीडा क्षेत्रात सातत्याने प्रगती करत राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे.

दिल्ली येथे झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. या यशामध्ये तेजस्वीच्या उत्कृष्ट खेळाचा मोलाचा वाटा राहिला. तिच्या खेळातील आत्मविश्वास, संघभावना आणि जिद्दीमुळे ती सर्वांच्या कौतुकास पात्र ठरली आहे.

तेजस्वी ही  पुणे शहरातील युवा उद्योजक भास्करशेठ गांजे यांची पुतणी असून तिच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे, पुणे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रदादा गावडे, शिरूर पंचायत समिती सदस्या सुनीताताई कड यांनी तेजस्वीचे विशेष अभिनंदन करत तिच्या पुढील क्रीडा कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.

 

तसेच गावातील सरपंच, उपसरपंच,सदस्य, चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार, शिक्षकवर्ग आणि क्रीडाप्रेमींनीही तेजस्वीच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यास नवी प्रेरणा मिळाली आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका