पुणे जिल्हा परिषदेत भाजप गटनेते पदासाठी राजेंद्र पोपटराव गावडे यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर
शिरूर तालुक्यातील तीन विजयी सदस्यांपैकी गावडे यांना संधी द्यावी शिरूरच्या जनतेची मागणी
शिरूर तालुका (प्रतिनिधी)
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली असली तरी विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे दहा सदस्य विजयी झाल्याने भाजपच्या गटनेतेपदाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.या पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्यातील कवठे येमाई–टाकळी हाजी गटातून प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले राजेंद्र पोपटराव गावडे यांचे नाव गटनेतेपदासाठी सर्वात पुढे असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.
पुणे जिल्ह्यात भाजपचे एकूण दहा सदस्य विजयी झाले असून त्यापैकी तब्बल तीन सदस्य शिरूर तालुक्यातून निवडून आल्याने तालुक्याचे राजकीय महत्त्व लक्षणीयरीत्या वाढले आहे. कवठे येमाई–टाकळी हाजी गटातून राजेंद्र पोपटराव गावडे, रांजणगाव गणपती गटातून स्वाती दत्तात्रय पाचुंदकर आणि तळेगाव ढमढेरे गटातून दिपाली राहुल गव्हाणे यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत शिरूर तालुक्याचा प्रभाव अधिक ठळकपणे दिसून येत आहे.

शिरूर तालुक्याचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या राजकीय परंपरेचे सक्षम वारसदार म्हणून राजेंद्र गावडे यांची ओळख निर्माण झाली आहे.गावोगावी विकासकामे, जनसंपर्क आणि ठाम नेतृत्व यामुळे त्यांनी जनतेच्या मनात विश्वासार्ह स्थान निर्माण केले आहे.अनेक राजकीय आव्हाने आणि विरोधकांच्या अडथळ्यांवर मात करत त्यांनी जनतेच्या बळावर विजय मिळवला आहे.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी नाकारल्यानंतर जनतेच्या आग्रहास्तव राजेंद्र गावडे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत निवडणूक लढवली. या निर्णयाला मतदारांनीही मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करून विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास दाखवला. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाकडे आता जिल्हा पातळीवरही गांभीर्याने पाहिले जात आहे.
गावडे कुटुंबीयांनी गेल्या सहा दशकांपासून जिल्हा परिषदेत सातत्याने प्रतिनिधित्व केले असून माजी आमदार पोपटराव गावडे यांनी जवळपास दहा वर्षे तालुक्याचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत गावडे कुटुंबीयांचे मजबूत राजकीय अस्तित्व आजही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या दहा सदस्यांमध्ये अनुभव, जनाधार, संघर्षशील वृत्ती आणि तालुक्याच्या प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडण्याची क्षमता यामुळे राजेंद्र पोपटराव गावडे यांचे नाव गटनेतेपदासाठी सर्वाधिक योग्य मानले जात आहे. पक्षातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील त्यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देत असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, शिरूर तालुक्याला जिल्हा परिषदेत प्रभावी आवाज मिळावा आणि तालुक्याच्या विकासाच्या प्रश्नांना भक्कम नेतृत्व लाभावे यासाठी राजकीय समीकरणे पाहता भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर राजेंद्र गावडे यांच्या नावावर गटनेतेपदासाठी सकारात्मक विचार सुरू असून त्यांच्या नावावर जवळपास एकमत झाल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांकडून मिळत आहे.
“राजकीय जाणकारांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली असती तर राजेंद्र गावडे हे आज जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीतील प्रमुख दावेदार म्हणून समोर आले असते. मात्र तिकीट नाकारल्यानंतरही त्यांनी जनतेच्या पाठिंब्यावर विजय मिळवत आपले राजकीय वजन सिद्ध केले आहे.”