ताजे अपडेट

टाकळी हाजीत लोडशेडिंगचा वाढता फटका; विद्यार्थी-शेतकरी हैराण, गाव अंधारात

टाकळी हाजी (विजय थोरात)

चैत्र महिन्यातील पहिला गुढीपाडवा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाच टाकळी हाजी परिसरात सुरू असलेल्या सायंकाळच्या लोडशेडिंगमुळे यंदाचा सण अंधारातच साजरा करावा लागणार की काय, अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगू लागली आहे.

टाकळी हाजी येथील ३३/११ केव्ही वीज उपकेंद्रातून निघणाऱ्या सर्व फिडरच्या थ्री फेज वीजपुरवठ्याच्या वेळेत करण्यात आलेल्या बदलामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नव्या वेळापत्रकानुसार सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत लोडशेडिंग होत असल्याने गाव अक्षरशः अंधाराच्या विळख्यात सापडत आहे.

 

सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असून, नेमक्या अभ्यासाच्या वेळेतच वीज खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. “दिवसभर शाळा आटोपून सायंकाळी अभ्यासाला बसलो की लाईट जाते, मग अभ्यास कसा करायचा?” असा सवाल विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे पालकांमध्येही चिंतेचे वातावरण पसरले आहे.

दुसरीकडे शेतकऱ्यांचीही अवस्था बिकट झाली आहे. शेतात पाणी देण्यासाठी मोटार सुरू केली की काही वेळातच वीज खंडित होते. “मोटार लावून शेतात पोचतो तोवर लाईट जाते, परत-परत ये-जा करण्यातच वेळ जातो,” अशी व्यथा शेतकरी मांडत आहेत. त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देणे कठीण झाले असून उत्पादनावर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, उन्हाळ्याचा कडाका दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसभर तापलेले वातावरण आणि रात्रीही न कमी होणारा उकाडा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अशा वेळी सायंकाळी वीज नसल्याने घराघरांत त्रास वाढला असून लहान मुले, महिला आणि वृद्धांची अक्षरशः लाहीलाही होत आहे.

एकूणच, सणासुदीच्या तोंडावरच वीज कपातीचा वाढता फटका बसत असल्याने टाकळी हाजीकरांमध्ये नाराजी वाढत आहे. वीजपुरवठ्याच्या या नव्या वेळापत्रकाचा तातडीने पुनर्विचार करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका