उचाळेवस्ती शाळेत विद्यार्थ्यांची बाजारपेठ; बाल आनंद बाजारात मोठा उत्साह
टाकळी हाजी (प्रतिनिधी)
टाकळी हाजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उचाळेवस्ती येथे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, उद्योजकता व व्यवहारज्ञानाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘बाल आनंद बाजार’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध प्रकारचे खाद्यपदार्थ व वस्तूंची विक्री करत प्रत्यक्ष बाजारपेठेचा अनुभव घेतला.

या बाल आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी घरातून तयार करून आणलेले नाष्टा पदार्थ, पालेभाज्या, फळे तसेच इतर विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी मांडल्या होत्या. लहानग्या विद्यार्थ्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्याने आवाज देत आपला माल विक्रीसाठी मांडला. त्यामुळे शाळेच्या परिसरात खऱ्या बाजारपेठेचे वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये उत्साह, आनंद आणि चैतन्य दिसून येत होते.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना खरेदी-विक्रीची प्रक्रिया, पैशाचे व्यवस्थापन, नफा-तोटा, ग्राहकांशी संवाद साधणे यासारख्या व्यवहारिक गोष्टींचे ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून मिळाले. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या वस्तूंची विक्री करून आत्मविश्वासही वाढवला. या बाजारात साधारणपणे दहा हजार रुपयांची उलाढाल झाल्याचे शिक्षकांनी सांगितले.
या उपक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब दरेकर सर, सहशिक्षिका मंदा सोदक मॅडम तसेच आदर्श शिक्षक दत्तात्रय चिकटे सर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास जायकर, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विलास साबळे, समिती सदस्य तसेच उचाळेवस्तीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे मत व्यक्त केले.
बाल आनंद बाजारामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची भावना, व्यवसायाची प्राथमिक समज आणि सामूहिक कार्याची सवय निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यवहारिक ज्ञान मिळत असल्याने हा उपक्रम सर्वांच्या पसंतीस उतरला.