संघर्षातून नेतृत्वाकडे; लोहार समाजाच्या उभारणीत दत्तात्रय कोंडीराम पोपळघट यांची लोहार युथ फाउंडेशनच्या राज्य कार्यकारिणी संचालकपदी निवड
पत्रकार विजयकुमार थोरात

समाजासाठी अखंड सेवेला मिळाली राज्यस्तरीय दा
पुणे (प्रतिनिधी)
समाजासाठी काम म्हणजे केवळ पद नव्हे, तर ती एक तपस्या असते आणि हीच तपस्या गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने करणारे सन्मा.दत्तात्रय कोंडीराम पोपळघट आज लोहार समाजाच्या राज्यस्तरीय नेतृत्वात स्थान मिळवत आहेत. लोहार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व युवक सक्षमीकरणासाठी अहोरात्र झटणाऱ्या दत्तात्रय कोंडीराम पोपळघट यांची लोहार युथ फाउंडेशनच्या राज्य कार्यकारिणी संचालकपदी निवड करण्यात आली असून, ही निवड संपूर्ण लोहार समाजासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
श्री क्षेत्र देवगड येथे संपन्न झालेल्या लोहार युथ फाउंडेशनच्या राज्यस्तरीय कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ही निवड करण्यात आली. या वेळी फाउंडेशनच्या माजी अध्यक्ष दिपालीताई रवींद्र विघवे, माजी उपाध्यक्षा शीतलताई संजय खंडागळे, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष किशोर प्रकाश सोनवणे, राज्य उपाध्यक्ष नितेश विठ्ठल लोखंडे व राज्य कार्याध्यक्ष अजय हरिभाऊ खंडागळे यांच्या हस्ते दत्ताभाऊ पोपळघट यांना निवडीचे मानपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.
दत्ताभाऊ पोपळघट यांचे समाजकार्य हे केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून दिसून आले आहे.अहिल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण मध्य महाराष्ट्रात लोहार समाजातील सामान्य कुटुंबांच्या प्रश्नांसाठी ते कायम पुढाकार घेत राहिले आहेत. युवक मेळावे, समाज प्रबोधन कार्यक्रम, अन्यायाविरोधातील आंदोलने, उपोषणे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांसाठी दिशा देणारे उपक्रम, वधू-वर परिचय मेळावे, तसेच समाजाचे हक्क आणि अस्तित्व अधोरेखित करणारी अधिवेशने या सर्व माध्यमांतून त्यांनी समाजातील तरुण पिढीला जागृत व संघटित करण्याचे कार्य केले आहे.
विशेष म्हणजे, “संघटना ही व्यक्तीपेक्षा मोठी असते” या विचाराने काम करत त्यांनी कोणताही भेदभाव न करता समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण भागातील युवकांपासून ते शहरातील विद्यार्थ्यांपर्यंत, शिक्षण, रोजगार आणि सामाजिक सन्मान या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. त्यांच्या कार्यपद्धतीत सातत्य, संयम आणि संघर्षशील वृत्ती ठळकपणे दिसून येते.
आजवर विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतर थेट राज्य कार्यकारिणी संचालकपदी त्यांची निवड होणे ही त्यांच्या कार्याची पोचपावती मानली जात आहे. लोहार समाजातील अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या संघटनेत राज्यस्तरीय नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारल्याने आता समाजाच्या प्रश्नांना अधिक ठोस, संघटित आणि प्रभावीपणे वाचा फुटेल, अशी अपेक्षा समाजबांधवांकडून व्यक्त होत आहे.
दत्ताभाऊ पोपळघट यांची ही निवड विशेषतः तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत असून, प्रामाणिकपणा, सातत्य आणि समाजनिष्ठा यांमधूनच नेतृत्व घडते, हा संदेश समाजात पोहोचवत आहे. त्यांच्या निवडीबद्दल लोहार समाजातील विविध संघटना, कार्यकर्ते व नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, येत्या काळात लोहार समाजाच्या हक्कांसाठी, शिक्षण-रोजगाराच्या संधींसाठी आणि सामाजिक सशक्तीकरणासाठी त्यांचे कार्य अधिक व्यापक, दिशादर्शक व परिणामकारक ठरेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे.

