ताजे अपडेट

आपत्ती व्यवस्थापन संघाचा झेंडा दुबईत फडकला

आपत्ती व्यवस्थापन संघाच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय गौरव; दौलत शितोळे यांना ‘मिलेनियर लाईफस्टाईल अवॉर्ड’

शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात 

आपत्ती काळात जीव धोक्यात घालून हजारो नागरिकांचे प्राण वाचविणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन संघाच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला असून, संघाचे संस्थापक व अध्यक्ष दौलत उमाजी शितोळे यांना ‘द मिलेनियर क्लब, दुबई’ यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘मिलेनियर लाईफस्टाईल अवॉर्ड’ जाहीर करण्यात आला आहे.

सन २०१२ मध्ये स्थापन झालेल्या शिंदोडी येथील आपत्ती व्यवस्थापन संघाने देशातील अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तींमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. उत्तराखंड येथील भूस्खलनात संघाच्या स्वयंसेवकांनी ४ हजारांहून अधिक नागरिकांचे प्राण वाचविले, तर २०१९ साली सांगली महापुरात हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी स्वयंसेवक रात्रंदिवस कार्यरत होते. माळीण गावातील दुर्घटनेतही ३०० पेक्षा अधिक जीव वाचविण्यात संघाला यश आले होते.
याशिवाय बेवारस मृतदेहांचे सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार, गुन्हेगारी प्रकरणांमध्ये मृतदेह शोधण्यासाठी प्रशासनाला सहकार्य, रस्ता अपघातग्रस्तांना तातडीची मदत, प्राथमिक उपचार, तसेच अपघात प्रतिबंधासाठी जनजागृती उपक्रम संघाच्या माध्यमातून सातत्याने राबविले जात आहेत.
हा पुरस्कार दि. २५ जानेवारी रोजी रॅमी डाउन टाउन हॉटेल, दुबई येथे प्रदान करण्यात येणार असून, समाजासाठी निःस्वार्थपणे केलेल्या सेवेला मिळालेला हा सन्मान संघासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. भविष्यातही नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन संघ तत्पर राहील, असा विश्वास यावेळी दौलत शितोळे यांनी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका