ताजे अपडेट

लोहार समाजाच्या विकासासाठी नवे बळ; नितेश विठ्ठल लोखंडे यांची LYF च्या राज्य उपाध्यक्षपदी निवड

गावकुसाबाहेर जाऊन समाजाचा आवाज पोहोचवणाऱ्या तरुण नेतृत्वावर राज्यस्तरीय जबाबदारी

शिरूर (प्रतिनिधी)

लोहार समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी, शिक्षणाच्या प्रवाहात तरुण पिढी आणण्यासाठी आणि युवकांना संघटित करण्यासाठी सातत्याने झटणाऱ्या रांजणगाव गणपती येथील उद्योजक सन्मा.नितेश विठ्ठल लोखंडे यांची लोहार युथ फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.श्रीक्षेत्र देवगड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ही निवड जाहीर होताच राज्यभरातील लोहार समाजात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेले नितेश लोखंडे यांनी समाजकार्याला केवळ भाषणापुरते न ठेवता प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. शिक्षण, रोजगार, समाजाच्या हक्कांचे प्रश्न आणि युवकांचे संघटन या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने काम केले. त्यामुळे ही निवड केवळ पदाची नसून, समाजासाठी केलेल्या प्रामाणिक व सातत्यपूर्ण कार्याची पावती असल्याची भावना समाजबांधवांतून व्यक्त होत आहे.

लोहार युथ फाउंडेशनच्या माजी अध्यक्ष दिपालीताई रवींद्र विघवे व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शीतलताई संजय खंडागळे यांच्या हस्ते नितेश लोखंडे यांना निवडीचे मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यभरातून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात या निवडीचे स्वागत केले.

नितेश लोखंडे यांनी गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही लोहार समाजापर्यंत संघटनेचे विचार, योजना व हक्क पोहोचवण्यासाठी मेहनत घेतली आहे. युवक मेळावे, सामाजिक आंदोलन, उपोषण, शासकीय कार्यालयांत पाठपुरावा, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरे, विद्यार्थी गुणगौरव सोहळे, प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव, वधू-वर परिचय मेळावे तसेच विविध सामाजिक व प्रबोधनात्मक अधिवेशनांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागातील तरुणांना एकत्र आणले आहे.
साध्या सदस्यपदापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवरील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत आज राज्य उपाध्यक्षपदापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे लोहार समाजात नव्या अपेक्षा, नवा उत्साह आणि एकजुटीचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक व युवक प्रश्नांना आता अधिक प्रभावीपणे वाचा फुटेल, असा विश्वास समाजबांधव व्यक्त करत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय इघे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सागर आगळे यांनी मानले. नितेश लोखंडे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आगामी काळात लोहार समाजासाठी त्यांचे कार्य अधिक व्यापक, संघटित आणि दिशादर्शक ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका