ताजे अपडेट

किशोर प्रकाश सोनवणे यांची लोहार युथ फाऊंडेशनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड

लोहार समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाच्या हाती राज्याची धुरा

पुणे (प्रतिनिधी)

लोहार समाजाच्या सामाजिक न्याय, शैक्षणिक प्रगती आणि युवक सक्षमीकरणासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाला राज्यस्तरीय जबाबदारी मिळाली आहे. लोहार समाजाच्या प्रश्नांना रस्त्यापासून सभागृहापर्यंत मांडणारे, तरुणाईला संघटित करणारे आणि समाजाला आत्मसन्मानाची जाणीव करून देणारे किशोर प्रकाश सोनवणे यांची लोहार युथ फाउंडेशनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. श्री क्षेत्र देवगड येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ही निवड जाहीर करण्यात आली.

ही निवड केवळ पदाची नसून, लोहार समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या दीर्घ संघर्षाची पावती असल्याचे मत समाजबांधव व्यक्त करत आहेत. लोहार युथ फाउंडेशनच्या माजी अध्यक्ष दिपालीताई रवींद्र विघवे व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष शीतलताई खंडागळे यांच्या हस्ते किशोर सोनवणे यांना निवडीचे मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी राज्यभरातून आलेले पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किशोर सोनवणे यांनी गेल्या अनेक वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये लोहार समाजाच्या प्रश्नांना आवाज दिला आहे. युवक मेळावे, सामाजिक आंदोलन, उपोषण, शासकीय कार्यालयांत पाठपुरावा, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरे, स्पर्धा परीक्षांसाठी दिशा देणारे उपक्रम, विद्यार्थी गुणगौरव सोहळे, प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव, वधू-वर परिचय मेळावे व समाज प्रबोधन अधिवेशने अशा विविध उपक्रमांतून त्यांनी समाजातील तरुणाईला संघटित करण्याचे मोलाचे काम केले आहे.
ग्रामीण व वंचित घटकातील तरुणांना शिक्षण, रोजगार आणि नेतृत्वाच्या संधी मिळाव्यात, हा त्यांचा सातत्याचा प्रयत्न राहिला आहे. लोहार समाजाचा इतिहास, कौशल्य, श्रमसंस्कृती आणि योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यावर त्यांनी विशेष भर दिला आहे. समाज केवळ मागण्या करणारा नसून, सक्षम आणि स्वावलंबी झाला पाहिजे, ही त्यांची भूमिका कार्यातून दिसून येते.
लोहार युथ फाउंडेशनमध्ये साध्या सदस्यपदापासून कार्यरत राहून तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरील विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्यानंतर थेट राज्य कार्यकारिणी अध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर आली आहे. त्यामुळे लोहार समाजात नव्या आशा, अपेक्षा आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फुटेल, असा विश्वास समाजबांधव व्यक्त करत आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय इघे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सागर आगळे यांनी मानले. किशोर सोनवणे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, लोहार समाजाच्या एकात्मतेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे नेतृत्व दिशादर्शक ठरेल, असा दृढ विश्वास व्यक्त केला जात आहे.

“लोहार समाजाच्या हक्क, शिक्षण आणि आत्मसन्मानासाठी लढणे हे माझ्यासाठी पद नाही तर जबाबदारी आहे. प्रत्येक लोहार तरुण सक्षम, शिक्षित आणि स्वावलंबी व्हावा, हाच माझा संकल्प आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यभर ठोस आणि सकारात्मक काम करू.”

*सन्मा.किशोर प्रकाश सोनवणे (अध्यक्ष-लोहार युथ फाउंडेशन,महाराष्ट्र राज्य)*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका