पोलीस उपनिरीक्षक पदी विशाल घाडगे यांची महाराष्ट्रातून पाचव्या क्रमांकावर निवड; बिजवडी इंदापूर परिसरात आनंदाचे वातावरण
पोस्टमास्टर ते PSI – विशाल घाडगे यांची जिद्दीची यशोगाथा
शिरूर प्रतिनिधी : एकनाथ थोरात
बिजवडी (ता. इंदापूर) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या गट ‘ब’ अराजपत्रित सेवा परीक्षा २०२४ मधून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठी महाराष्ट्रातून पाचव्या क्रमांकावर विशाल गणपत घाडगे यांची निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे बिजवडी परिसरासह मित्रपरिवार आणि नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

विशाल घाडगे यांचे मूळ गाव चिंचोली (ता. सांगोला, जि. सोलापूर) असून सध्या ते बिजवडी (ता. इंदापूर, जि. पुणे) येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे वडील कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, बिजवडी येथे क्लार्क पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. कुटुंबाकडून त्यांना मेहनत आणि प्रामाणिकपणाचे संस्कार लाभले.
विशाल यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले असून रोबोटिक्स आणि फॅब्रिकेशन या तांत्रिक क्षेत्रातही त्यांनी कामाचा अनुभव मिळवला आहे. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्रातही त्यांची ओळख असून ते लेदर क्रिकेटमधील वेगवान गोलंदाज म्हणूनही परिचित आहेत.
त्यांना निमोणे (ता. शिरूर) येथे पोस्टमास्टर पदावर काम करण्याचा अनुभव आहे. नोकरीची जबाबदारी सांभाळत त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सातत्याने सुरू ठेवला. कठोर परिश्रम, चिकाटी आणि कुटुंबीयांच्या पाठबळामुळे त्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट ‘ब’ अराजपत्रित सेवा परीक्षा २०२४ मध्ये यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर महाराष्ट्रात पाचव्या क्रमांकावर निवड झाली
त्यांच्या या यशामुळे बिजवडी परिसरात आनंदाचे वातावरण असून ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. ग्रामीण भागातील युवकांनी जिद्द आणि सातत्याच्या बळावर स्पर्धा परीक्षेत यश मिळवता येते, याचे उदाहरण विशाल घाडगे यांच्या यशातून समोर आले आहे.