बापूसाहेब गावडे विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा सन्मान
टाकळी हाजी (प्रतिनिधी)
मा.बापुसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टाकळी हाजी येथे ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान समारंभ उत्साहात पार पडला.समाजातील महिलांचे योगदान, त्यांचे कर्तृत्व आणि समाज उभारणीत असलेली त्यांची महत्त्वाची भूमिका याची जाणीव करून देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख पाहुण्या म्हणून ग्रामविकास शिक्षण संस्थेच्या सहसचिव सुनीताताई गावडे उपस्थित होत्या.टाकळी हाजी या बेट भागाचे जिल्हा परिषदेत नेतृत्व करत त्यांनी शेती, समाजकारण आणि राजकारण या क्षेत्रात खंबीरपणे कार्य करत आपला ठसा उमटवला आहे.माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रदादा गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात विकासाची गंगा आणण्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. महिलांनी आत्मविश्वास, शिक्षण आणि कर्तृत्वाच्या जोरावर समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी यावेळी दिला.
जागतिक महिला दिन हा महिलांच्या अधिकार, समानता आणि सन्मानाचा संदेश देणारा दिवस असून कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान अनमोल आहे.आजच्या काळात महिला शिक्षण, शेती, उद्योग, सामाजिक क्षेत्र तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत समाजाला नवी दिशा देत आहेत.अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे हीच महिला दिन साजरा करण्यामागची खरी भावना असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी सुनीताताई गावडे यांच्या हस्ते विद्यालयातील मध्यान्ह भोजन तयार करणाऱ्या सुमनबाई माळी व फुलाबाई धुळे यांचा साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला.तसेच शाळेच्या विविध उपक्रमांना सहकार्य करणाऱ्या मनीषा घोडे व सविता निघोजकर या महिलांचाही गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.
या प्रसंगी ग्रामविकास शिक्षण संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अजित गावडे सर, विद्यालयाचे प्राचार्य एस. एस.वाघमारे सर, पर्यवेक्षक के.एस.वाघमारे सर,महिला शिक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षिका भारती चाटे मॅडम यांनी केले.सुनीताताई गावडे यांच्या बहुमोल मार्गदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप झाला.