टाकळी हाजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव
टाकळी हाजी (विजय थोरात)
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच आयटीसी मिशन सुनहरा कल अंतर्गत फिनिश संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.या कार्यक्रमामुळे शाळेचे सामाजिक बांधिलकीचे कार्य अधोरेखित झाले.

या कार्यक्रमात टाकळी हाजी गावच्या सरपंच अरुणाताई दामूशेठ घोडे, कवठे यमाई येथील मुख्याध्यापिका रंजनाताई पोपटराव गावडे, ग्रामसखी आशा बाबू बोखारे, आरोग्य सेविका मंगल दत्तात्रय घोडे, अंगणवाडी सेविका सत्यभामा अरुण आपटे, अर्चना भाऊसाहेब साबळे व अंजली मधुकर काळे या महिलांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

समाजातील विविध क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्याचा यावेळी विशेष उल्लेख करण्यात आला.कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य राजेंद्रदादा गावडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुनीताताई गावडे, टाकळी हाजीच्या सरपंच अरुणाताई घोडे, उपसरपंच गोविंद गावडे, ग्रामपंचायत सदस्य प्रियंका उचाळे यांच्यासह आयटीसी मिशन सुनहरा कल अंतर्गत फिनिश संस्थेचे अधिकारी अमोल नुणेकर सर, प्रोजेक्ट ऑफिसर संदीप भोरे सर, गणेश शेळके सर, सुपरवायझर अनिता अभंग मॅडम, शबाना पटेल मॅडम, माजी ग्रामपंचायत सदस्य धोंडिभाऊ जाधव, पोलिस पाटील शोभाताई मंदिलकर, केंद्रप्रमुख महादेव बाजारे सर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष किशोर बारहाते व उपाध्यक्षा रेणुका पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. महिलांचे समाजातील योगदान अत्यंत महत्त्वाचे असून शिक्षण, आरोग्य, सामाजिक कार्य आणि ग्रामविकासात महिलांची भूमिका निर्णायक असल्याचे मान्यवरांनी आपल्या मनोगतातून अधोरेखित केले. ग्रामीण भागातील महिलांनी पुढे येऊन समाज विकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी महिला सक्षमीकरणावर प्रभावी भाषणे केली. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम उपस्थितांच्या पसंतीस उतरले. महिला दिनानिमित्त महिला भगिनींसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाला रंगत आणली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक रामदास कौठाळे सर, मंगल गावडे मॅडम, प्राजक्ता मुळे मॅडम, अर्जुन पांढरकर सर, अंगणवाडी सेविका वैशाली खराडे मॅडम तसेच शाळेतील सर्व शिक्षक व सहकाऱ्यांनी मोलाची साथ दिली.
टाकळी हाजी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आयोजित केलेला हा महिला मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजातील महिलांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा हा कार्यक्रम ठरला.