मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत गावडे विद्यालयाची श्रेया राजेंद्र शिंगाडे केंद्रात प्रथम
टाकळी हाजी (प्रतिनिधी)
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील मा.बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता सहावीतील कु.श्रेया रूपाली राजेंद्र शिंगाडे हिने मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत केंद्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे.तसेच तिने जिल्ह्यात ४४ वा व राज्यात ५० वा क्रमांक पटकावत शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.

अभ्यासात सातत्य, चिकाटी आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर श्रेयाने हे यश मिळवले आहे. तिच्या या यशामागे मार्गदर्शक शिक्षक दौलत सोनवणे यांचे विशेष योगदान असून त्यांनी दिलेले शैक्षणिक मार्गदर्शन निर्णायक ठरले.
श्रेया हिने मागील वर्षी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत ८६ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांकाने शिष्यवृत्ती मिळवली होती. त्या वेळी मार्गदर्शक शिक्षिका भारती चाटे यांनी तिच्यावर मेहनत घेत योग्य दिशा दिली होती. त्यामुळेच श्रेयाचा यशाचा हा प्रवास सातत्यपूर्ण राहिला आहे.
श्रेया हिचे आई रुपाली व वडील राजेंद्र हे शेती व्यवसाय करत असून, ग्रामीण व साध्या परिस्थितीतून तिने मिळवलेले हे यश प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या यशामागे कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे.
शाळेतील शिक्षकवर्गानेही तिच्या अभ्यासात विशेष लक्ष देत तिला प्रोत्साहन दिले. तिच्या या यशाबद्दल ग्रामीण विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे, प्राचार्य संजय वाघमारे, व्यवस्थापकीय संचालक अजित गावडे, सरपंच अरुणा घोडे व उपसरपंच मोहन चोरे यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. श्रेया शिंगाडे हिच्या या यशामुळे टाकळी हाजी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, इतर विद्यार्थ्यांसाठी ती प्रेरणास्थान ठरत आहे.