कृषी दिनानिमित्त किंजळोली बु.व तळोशी येथे इंडसइंड बँक व अंबुजा फाउंडेशन यांच्या वतीने ग्रामसंघांना शेती यंत्रांचे वाटप
महाड (प्रतिनिधी)
महाड तालुक्यातील किंजळोली बु.व तळोशी येथे कृषी दिनानिमित्त इंडसइंड बँक व अंबुजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या एकात्मिक जलस्त्रोत व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत, उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या नाते विभागातील किंजळोली बुद्रुक, किंजळोली खुर्द, तळोशी, पुनाडे तर्फे नाते आणि कोंझर या पाच ग्रामसंघांना शेतीसाठी आवश्यक आधुनिक यंत्रांचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत भात मळणी मशीन, गवत कापणी यंत्र तसेच पॉवर विडर या शेती यंत्रसामग्रीचे वितरण करण्यात आले. दिनांक १ जुलै रोजी कृषी दिनाचे औचित्य साधून संबंधित ग्रामसंघांकडे या यंत्रांचे हस्तांतरण करण्यात आले.
या आधुनिक यंत्रसामग्रीमुळे शेतीची कामे अधिक जलद व कार्यक्षम पद्धतीने होऊन वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होणार आहे. तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर वाढण्यास चालना मिळणार आहे. विशेष म्हणजे, महिला बचत गटांना या यंत्रांच्या माध्यमातून सेवा-आधारित व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
या कार्यक्रमास पंचायत समितीचे मा. गट विकास अधिकारी श्री. उदयसिंह साळुंखे सर, मा. सहाय्यक गट विकास अधिकारी श्री. रोहन तावरे सर, विस्तार अधिकारी, अंबुजा फाउंडेशनचे श्रीधर मुरगुडे व साक्षी बेटकर, तसेच उमेद अभियानाचे तालुका अभियान व्यवस्थापक श्री.संचित पार्टे उपस्थित होते. कार्यक्रमास संबंधित ग्रामसंघातील विविध ग्रामसखी, ग्रामसंघातील सर्व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या समारोपापूर्वी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला व उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला