ताजे अपडेट

उरळगाव शाळेच्या स्नेहसंमेलनात लहानग्यांच्या कलागुणांची दिमाखदार उधळण

 

शिरूर (प्रतिनिधी)

पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उरळगाव ता. शिरूर येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेले वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहपूर्ण वातावरणात आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास पालक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.

 

कार्यक्रमाची सुरुवात शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निकिता नवले यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर सरस्वती पूजन सरपंच स्वप्नील गिरमकर तसेच ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद सदस्य राहुलदादा गव्हाणे, पंचायत समिती सदस्य विजय रणसिंग तसेच डिंग्रजवाडी येथील युवा कार्यकर्ते कानीफ गव्हाणे उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक राजेंद्र गिरमकर यांनी करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी नृत्य, देशभक्तीपर गीते, नाटिका, वेशभूषा सादरीकरण अशा विविध कार्यक्रमांतून आपले कलागुण सादर केले. लहानग्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाला उपस्थितांकडून टाळ्यांचा कडकडाट लाभला.शाळेतील शिक्षिका शुभांगी अबनावे, वर्षा बोरुडे यांनी मेहनत घेतली. यशस्वीरीत्या कार्यक्रम पार पडण्यासाठी शाळेतील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक दिपक अबनावे यांनी केले.सूत्रसंचालन संभाजी सरड यांनी तर मान्यवरांचे स्वागत भाऊसाहेब कोकडे यांनी प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सागर कोळपे यांनी उपस्थित पालक, मान्यवर व देणगीदारांचे आभार मानले. कार्यक्रम सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उरळगाव ग्रामस्थांनी शिक्षकवृंद व शाळा व्यवस्थापन समितीचे विशेष कौतुक केले. या स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका