ताजे अपडेट

“टाकळी हाजीची तन्वी सुनील थोरात अव्वल; सीबीएसई दहावीमध्ये 97.80% गुणांची सुवर्णकामगिरी”

शिरूर (प्रतिनिधी)

टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील कु.तन्वी अनिता सुनील थोरात हिने (सीबीएसई) दहावीच्या परीक्षेत तब्बल ९७.८०% गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे.पोदार इंटरनॅशनल स्कूल शिरूर येथील विद्यार्थीनी असलेल्या कु.तन्वी सुनील थोरातने आपल्या अथक परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर हे घवघवीत यश मिळवत टाकळी हाजी गावाच्या नावाला पुणे जिल्हा स्तरावर मानाचा तुरा मिळवून दिला आहे.

 

दहावीची परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जाते.अशा निर्णायक टप्प्यावर एवढ्या उच्च गुणवत्तेचे यश मिळवणे म्हणजे तन्वीच्या चिकाटीचा, आत्मविश्वासाचा आणि अभ्यासू वृत्तीचा प्रत्यय आहे. तिच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबीयांचाच नव्हे तर संपूर्ण टाकळी हाजी गावाचा अभिमान उंचावला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ती एक प्रेरणादायी आदर्श ठरली आहे.

 

तन्वीचे आई अनिता व वडील सुनील थोरात हे प्रगतशील शेतकरी असून, त्यांनी शेती व्यवसाय सांभाळत आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी कोणतीही तडजोड केली नाही.ग्रामीण वातावरणात राहूनही आधुनिक शिक्षणाची गरज ओळखून त्यांनी तन्वीला उत्तम शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिले. तिच्या यशामागे आजी आजोबां,आई-वडिलांचे संस्कार, कष्ट, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सतत दिलेले प्रोत्साहन हेच खरे बळ ठरले आहे. मुलीच्या शिक्षणाला प्राधान्य देत त्यांनी समाजासमोर एक सकारात्मक आदर्श निर्माण केला आहे.

तन्वीने केवळ अभ्यासातच नव्हे तर शिस्त, वेळेचे नियोजन आणि ध्येय साध्य करण्याची वृत्ती यामध्येही स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या या यशामुळे टाकळी हाजी गावात शिक्षणाबाबत एक सकारात्मक वातावरण निर्माण होत असून, इतर विद्यार्थ्यांनाही अधिक मेहनत घेण्याची प्रेरणा मिळत आहे.

 

तन्वीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.याशिवाय गावातील विविध मान्यवर, शिक्षकवर्ग व ग्रामस्थांकडूनही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 

तन्वी थोरात हिचे हे दैदिप्यमान यश निश्चितच भविष्यातील मोठ्या यशाची नांदी ठरणार असून, तिच्या उज्ज्वलभविष्यासाठी सर्वत्र शुभेच्छा व्यक्त होत आहेत. तिच्या या पराक्रमामुळे टाकळी हाजी गावाचा शैक्षणिक नकाशावर ठसा उमटला असून, “मुलगी शिकली तर प्रगती झाली” या उक्तीला खऱ्या अर्थाने साकार करणारे हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका